पंकजा मुंडेंना मिळणार विधान परिषद?

Foto
भाजपच्या नाराज नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं अखेर राजकीय पुनर्वसन होणार आहे. भाजपकडून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राज्य भाजपच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून सुरू होणार्‍या पक्षाच्या अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.  येत्या एप्रिल महिन्यात विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्या जागा भरण्यासाठी विविध पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडं संख्याबळाचा मोठा आकडा असल्याने काही उमेदवारांना त्यांना विधान परिषदेवर सहज पाठवता येणार आहे. त्यासाठी पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजांचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी पंकजांना पराभवाची धूळ चारली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना झाल्यामुळं पंकजा मुंडे पक्षावर नाराज होत्या. मधल्या काळात त्यांच्या पक्षांतराच्या वावड्याही उठल्या होत्या. पक्षातील नाराजांसोबत भगवानगडावर समर्थकांचा मेळावा घेऊन त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडण्याची घोषणाही केली होती. पंकजांच्या या नाराजीची गंभीर दखल घेतल्याचे सध्याच्या घडामोडींतून दिसते आहे.